तंत्रज्ञान आणि पालक

तंत्रज्ञान आणि पालक
फॉरवर्ड क्लासेस डोंबिवली पश्चिम यांनी आयोजित केलेल्या तंत्रज्ञान आणि पालक या कार्यशाळेत अजय दरेकर यांनी केलेले मार्गदर्शन..
तीन वर्षाच्या मुलापासून ते  नव्वद वर्षांच्या आजोबांपर्यंत जग फक्त एका गोष्टी बरोबर जोडले गेले आहे, ती गोष्ट म्हणजे तंत्रज्ञान..! आपल्या मुलाने काहितरी भव्य दिव्य करावं, खुप काहीतरी चांगलं करून दाखवावं यासाठी प्रत्येक पालक झटत असतात. आपलं मुल चांगलं बनावं यासाठी मुलांच्या सर्व गरजा पुऱ्या करत असतात. सर्वांना फळ चांगलं हवं असतं. आपण सगळे पालक फळ चांगलं मिळावं म्हणून फळावरच काम करत असतो, कोणीही मुळांवर काम करायला तयार नसतो. फळांवर काम करू नका मुळांवर काम करा असा संदेशच आपल्याला अजय दरेकर देतात. भारतीय शिक्षण पद्धतीची मुळे शिक्षक आणि पालक ही आहेत, तर विद्यार्थी ही फळं आहेत.सर्वच जण मुले चांगली हुशार झाली पाहीजेत याची अपेक्षा करतात.म्हणजेच फळ चांगलं हवं पण मुळांची मशागत करायला कोणी तयार नाही. खरंतर मुळांवर काम करण्याची खरी गरज आहे. झाडांचं मुळ चांगलं तर फळही चांगलंच येणार..!
निरंतर सुधार ही काळाची गरज आहे. तंत्रज्ञानामुळे सतत नवीन नवीन गोष्टी घडत असतात. आपण जेव्हा लहान होतो तेव्हा रेडिओ होता त्यानंतर ब्लॅक अण्ड व्हाईट टी.व्ही.आला, त्यानंतर कलर टि.व्ही आला. पहिला खुप मोठा टि.व्ही होता आता एकदम चपटा झाला. ट्रंकॉल,पेजर,फोन,मोबाईल आणि आता स्मार्ट फोन आला.बघता बघता कलीयुगाने आपल्या घरात कधी प्रवेश केला हे समजलेच नाही. तंत्रज्ञान माणसाच्या जीवनातला अविभाज्य घटक आहे पण त्याचा वापर कसा करायला हवा हे आधी शिकायला हवे.आपल्याकडे अगोदरही २४
तासच होते आणि आताही २४ तासच आहेत.पण आता आपल्याकडे वेळ नाही.
आपल्या हातात मोबाईल यायला बरीच वर्षे गेली पण आपल्या मुलांच्या हातात मोबाईल लहान वयातच आले. हा फरक जेवढा कमी झालाय तेवढा त्रास वाढला आहे. जेव्हा एखादी गोष्ट आपल्या अंतर्मनात जाते तेव्हा ती सवय बनून जाते आणि एकदा बनलेली सवय सहज सुटणे अशक्य..! तंत्रज्ञान चांगले असले तरी त्याच्या आहारी जाणे योग्य नव्हे.तंत्रज्ञानाचा फायदा माणसाने प्रगती करण्यासाठी करायला हवा.मसाला वाटण्यासाठी पूर्वी पाटा होता आता मिक्सर आहे, पूर्वी ट्रंकॉल होता आता स्मार्ट फोन आहे. हे होणारे बदल म्हणजेच तंत्रज्ञान होय.
आजचा पालक खुप संभ्रमित आहे.योग्य काय आणि अयोग्य काय हे ठरवणं कठीण जात आहे. कारण आपला पायाच आपण विसरत चाललो आहोत.तंत्रज्ञानामुळे माणूस खुप फास्ट झाला आहे. परदेशात खुप चांगल्या प्रकारे याचा उपयोग करत आहेत. आपल्याकडेही तसा प्रयत्न होत आहे. पण पालकांच्या निष्काळजीपणा मुळे ते प्रयत्न फोल ठरत आहेत. काही शाळांमध्ये पुस्तकांचे ओझे कमी करण्यासाठी टॅब वापरायला दिले. हा तंत्रज्ञानाचा फायदा होता पण मुलांनी घरी येवून त्यात फोटो,गाणी, सिनेमा ,गेम आणि नको नको त्या गोष्टी भरून ठेवल्या. शाळेकडून बरेच प्रयत्न केले गेले पण प्रत्येक मुलांवर लक्ष ठेवण शक्य नव्हते. हि जबाबदारी खरंतर पालकांची होती. पालकांनी आपली जबाबदारी वेळीच ओळखली असती तर मुलांचे दप्तराचे ओझे कमी झाले असते. परदेशातील मुले तंत्रज्ञानाची मदत घेऊन अभ्यास करत आहेत आणि आपली मुले मात्र फेसबुक, व्हाट्सअप आणि अनेक सोशल साईट्सवर वेळ घालवत आहेत. पालकही तेच करत आहेत. घराघरात प्रत्येक लहान थोरांच्या हातात स्मार्टफोन आला आहे. परिणामांचा कोणीच विचार करत नाही आहे. व्हाट्सअपवर पाठवलेला प्रत्येक मेसेज अत्यंत महत्वाचा वाटू लागला आहे त्यामुळे थोड्या थोड्या वेळाने मोबाईल तपासत रहाण्याची आपल्याला सवय लागलेली आहे.आपण तंत्रज्ञानाच्या आहारी गेलो आहोत. आपल्या समोर असलेल्या व्यक्तींकडे दुर्लक्ष करून आपण आलेले मेसेज बघण्यात दंग होऊ लागलोय. म्हणजेच आपल्या समोर कोण आहे याबद्दल आपण बेफिकीर झालोय. घरात आल्यावर जेवतानाही आपल्यासमोर टी.व्ही. चालू असयला हवा.त्यामुळे घरात कोणाशीही मनमोकळ बोलणं होत नाही. कोणाला कार्यक्रम बघायचे असतात, कोणाला मॅच बघायची असते तर कोणाला कार्टून्स..! आपल्या जीवनात काय चालले आहे यावर चर्चा करायला कोणाला वेळ नाही.
अगोदर घरात एकच बाबा असायचे..! सगळ्या प्रश्नांची उत्तरे त्या़च्याकडे असायची पण आता प्रत्येक घरात एक नवीन बाबा आलाय.. गुगल बाबा..! त्यामुळे घरातल्या बाबाला आता कोण विचारेनासे झालेय. फेसबुकवर फोटो टाकून किती लाईक्स आणि किती कमेंट्स आलेत ते आपण थोड्या थोड्या वेळाने तपासत राहू लागलोय. यात मुलांबरोबर पालकही तेवढेच सहभागी असतात.
अजुन एक नवीन प्रकार.. सुसाईड अटेम्प्ट..! सरकारी आकडेवारी नुसार देशात जवळपास १४००० मुले शिक्षणाचा ताण सहन न झाल्यामुळे आत्महत्या करतात. शाळेत,कॉलेजमध्ये जाणाऱ्या आपल्या मुलांवर आपला लक्ष असतो काय..? आपली मुले आपल्या पासून बर्याच गोष्टी लपवत असतात. मुलांच्या देहबोलीतून बर्याच गोष्टी स्पष्ट होत असतात. पण एवढा वेळ आहे कोणाकडे..? विशेषतः कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलांकडे लक्ष असणे गरजेचे असते. वेगवेगळ्या कुटुंबातील, वेगवेगळ्या विचारांची मुले एकत्र आलेली असतात.मुलांना कोणाचे काय आवडू लागेल याचा नेम नसतो. अशावेळी पालकांनी सजग असणे महत्त्वाचे आहे. आपली मुले कोणाबरोबर असतात, कोणाशी मैत्री करतात, तणावाखाली वावरत तर नाही ना..हे पालक म्हणून आपल्याला मुलांच्या देहबोलीतून समजायला हवे. आपल्या मुलांच्या हाती स्मार्ट फोन देणे म्हणजे माकडाच्या हातात कोलीत देण्या सारखेच आहे. त्यामुळे निट लक्ष असणे गरजेचे आहे.
तंत्रज्ञानाच्या दृष्टचक्रात फक्त मुलेच अडकली आहेत असे नाही यात पालकही अडकले आहेत.आपल्या मुलांना या दृष्टचक्रातून बाहेर काढायचे असेल तर प्रथम या दृष्टचक्रातून आई वडीलांना बाहेर पडावं लागेल. दहावी पर्यंत हुशार असणारी मुले कॉलेजला गेल्यावर अचानक बिघडू लागतात हे घरात लगेच लक्षात यायला हवे.सोशल माडीयाच्या अती वापरामुळे प्रचंड नकारात्मकता वाढीस लागली आहे. प्रत्येक गोष्टीला वेळीच आवर घातला नाही तर वेळच निघून जाईल.आपल्या लहानपणी शाळा आणि अभ्यास संपला की आपण मैदानी खेळ खेळत असू पण आता मुले मात्र इंटरनेट, टी.व्ही.,गेम यात रमत आहेत. मोबाईल वर गेम खेळणार्या मुलांचे प्रमाण वाढत आहे.गेम कसले असतात तर गोळ्या झाडण्याचे.. हाणामारी करण्याचे..! सतत हे गेम खेळण्यामुळे मुलांना त्याची सवय होते.त्यांच्या अंतर्मनात ते उतरलं जात आणि पुढे तोच त्यांचा स्वभाव बनतो. पालकांना कळतही नाही कि आपलं मुल असं अचानक हिंस्त्र कसं काय बनलय..? पालक म्हणून आपणच याला जबाबदार असतो पण ते आपल्यालाच कळत नाही. भावनिक पातळी दिवसेंदिवस खालावत चालली आहे. त्याचा परिणाम सर्वांनाच भोगावा लागत आहे. अश्मयुगातून आपण आधुनिक युगात आलो पण तंत्रज्ञानाच्या अतिवापरामुळे आपण पुन्हा अश्मयुगाकडे जायची तयारी करू लागलोय. जगात ६०% लोकांना आरोग्याच्या समस्या आहेत पैकी २४% लोकांना फक्त तंत्रज्ञानामुळे समस्या आहेत. शारीरिक हालचाली मंदावत आहेत. तंत्रज्ञानाच्या वापराने मेंदूचा वापर कमी होत आहे.
प्रत्येक पालकांनी विचार करायला हवा,आपण लहान असताना आपले आई वडील घरात आल्यावर आपण कसे वागायचो..? आपले आई वडील आपल्या बरोबर कसा वेळ घालवायचे..? आणि आपण आपल्या मुलांबरोबर कसा वेळ घालवत आहोत..? हा एक प्रश्न जर पालकांनी सोडवला तर पालकांना तंत्रज्ञानाची भीती बाळगण्याची बिलकुल गरज नाही.
आज आपण एकाच घरात राहूनही संवाद मात्र हरवून बसलो आहोत.इंटरनेट वापरात भारत हा नंबर वन देश बनला आहे. इंटरनेटचा सर्वात जास्त वापर गुड मॉर्निग आणि गुड नाईटसाठी होऊ लागला आहे हे दुर्दैवी आहे. आपण तंत्रज्ञान वापरायला हवे पण तंत्रज्ञान आपल्याला वापरू लागलं आहे. खरंतर आपण आपल्या सोयीसाठी तंत्रज्ञान वापरत असतो पण ती सोय आपली कधी गरज बनून जाते ते आपल्यालाच कळत नाही.सगळ्या गोष्टी आपल्या हातात असतात फक्त संयम हवा. तुम्ही कोणाबरोबर वेळ घालवता आणि काय वाचता यावर बर्याच गोष्टी अवलंबून असतात. तुम्ही ठरवलात तर काहीही शक्य आहे. मुलांना कुठल्या वयात काय हवं आहे हे आपणच पहायला हवे.आपण काय करतो,आपण काय बघतो, आपण काय वाचतो,आपण काय ऐकतो हे आपली मुलं बघत असतात. हे बघुनच ती मोठी होत असतात.त्यामुळे प्रत्येक पायरीवर आपल्याला सजग रहायला हवे.
तंत्रज्ञान आपलं आयुष्य सुखकर करण्यासाठी आहे, आपलं आयुष्य आनंदी बनवण्यासाठी नाही हे लक्षात असूद्या.
           

धर्म आणि संस्कृती

धर्म आणि संस्कृती 
या भुतलावर परमेश्वर अनेक रूपात वावरत असतो. आपल्याला त्याचे जे रूप भावते त्या रूपात त्याला स्विकारावे. प्रत्येक वेळी जरूरी नाही कि तो देव देवतांच्याच रूपात असेल. जीथे गरज असते तिथे मदत करणाऱ्याच्या रूपातही तो असतोच की..! आपण काय मानतो यावर परमेश्वराचे स्वरूप अवलंबुन असते. मानला तर देव नाहीतर दगड. म्हणून प्रत्येकासाठी तो दगड असू शकत नाही. आपले मन हे सर्वशक्तीमान शक्ती आहे. देव असणं नसणं ही हे मनच ठरवतं. देव देवतांची अनेक रूपे आपण हजारो वर्षां पासून मानत आलो आहोत. आपल्या देशाच्या धर्म संस्कृतीचा पाया ही या रूपांवरच अवलंबुन आहे. अलिकडच्या काळात समाज खुपच प्रगत झाला आहे. या समाजाला धर्म संस्कृती यांच्याशी काहीच देणे घेणे नाही. मी किती पुढारलेलो आहे हे मिरवण्यातच तो धन्यता मानत आहे. धर्म आणि संस्कृती मध्ये काळाप्रमाणे बदल होणे आवश्यक आहे. ते जर झाले नाहीत तर तो समाज कट्टर वादी होतो आणि असा समाज पुढे आत्मघातकी होतो. काही लोक धर्म निरपेक्ष म्हणून मिरवतात पण त्यांच्या प्रत्यक्ष जीवनात ते धर्माशिवाय राहूच शकत नाही. आपला देश ही धर्म निरपेक्ष देश म्हणून शेखी मिरवत असतो पण अशी कुठली गोष्ट आहे कि धर्म आणि जाती शिवाय होते? मी कुठल्या जातीचा, कुठल्या धर्माचा, कुठल्या पंथाचा हे जगासमोर मोठ्या अभिमानाने मांडणारे आपण स्वतःला धर्म निरपेक्ष समजतो. प्रत्येक जण माझा धर्म कसा श्रेष्ठ हे समजावून सांगतानाच तुझा धर्म कसा वाईट हे सांगताना दिसत आहेत.
जगातल्या प्रत्येक समाजाचा पाया हा धर्म हाच आहे. मग तो कुठलाही असो. धर्माच्या नावावर समाज एकसंध होतो पण आधुनिक समाजात या गोष्टीचा फायदा करून घेण्याऐवजी एकमेकांची माथी भडकविण्याचे काम होताना दिसत आहे. हिंदू धर्म संस्कृती ही निसर्गातील बदलांवर आधारित आहे. प्रत्येक महीन्यात निसर्गात वेगवेगळे बदल होत असतात.ऋतूमाना प्रमाणे अनेक स्थित्यंतरे होत असतात. निसर्गात होणाऱ्या प्रत्येक बदलाचे स्वागत केवळ हिंदू धर्म संस्कृती मध्ये आहे. पण या संस्कृती ला मुळ धर्माचे स्वरूप आणून धर्म संस्कृती बदनाम करण्याचे काम होताना दिसत आहे.
                              ----- ✍जयेश अ. माधव
                             jayeshmadhav.blogspot.com

जननी आशिष...

डोंबिवली (प.) कडील हेंद्र्या कॉम्पलेक्स मधील आम्ही मित्रांनी एकत्र येऊन शनिवार दिनांक 19/11/2016 रोजी डोंबिवली पूर्व येथील " जननी आशिष चॅरीटेबल ट्रस्टला" मुलांसोबत भेट देऊन ट्रस्ट मधील 0 ते 6 वयोगटातील मुलांना आवश्यक गरजेच्या वस्तु आणि खाऊंचे वाटप केले तसेच ट्रस्ट मधील मुलांसोबत वेळ घालवला आणि त्यांच्यासोबत खेळही खेळले.
छोट्या छोट्या मुलांना पाहून सगळेच जण हळवे झाले होते.
यासाठी रमेश खुर्दड, संजय परदेशी, जयेश माधव, नितीन पवार, आशिष जाधव,समीर कुबल,सुरेश सावंत,दिलीप पाटील,अमोल जेठे विणा भाभी आणि प्राची सावंत मॅडम या सर्वांचे बहुमोल सहकार्य लाभले.
जननी आशिष चॅरीटेबल ट्स्टविषयी थोडेसे....
समाजातील अनाथ मुलांच्या पालन पोषणाच्या गरजेमधून 1989 साली डॉ.किर्तीदा प्रधान यांच्या प्रेरणेतून डोंबिवलीतील 21 महीलांनी एकत्र येऊन ही संस्था स्थापन केली. 0ते 6 वर्षांच्या अनाथ निराधार मुलांचे पालन पोषण आणि प्रमाने जपणूक या संस्थेत केले जाते. आई वडीलांच्या प्रेमाला पारखी झालेल्या या मुलांना प्रेमाच्या पंखाखाली वाढवले जाते. बहुतांश मुले ही पोलीसांनी आणुन दिलेली आहेत. वाट चुकलेली, आई वडिलांनी टाकलेली तसेच पोलीसांनी सोडवून आणलेली आहेत. अनाथ असणे म्हणजे काय हे आपल्याला अशा मुलांना बघीतल्यावर जाणवते. आपण त्यांच्याशी खेळायला गेलो तर ती लगेच आपल्यातील होऊन जातात. आपल्या मुलांना आपण जगातली सगळी सुखे देण्यासाठी आपल्या जीवाचा आटापीटा करत असतो मग या अशा आई वडीलांचे कृपा छत्र गमावलेल्या मुलांसाठी त्यांना हवं ते कोण देणार..? आपण घरात जेव्हा आपल्या मुलांचा विचार करतो तेव्हा मनाच्या एका कोपऱ्यात या मुलांसाठी थोडीशी जागा ठेवायला नको का..? आपल्या छोट्या मुलांसोबत ही मुले एकरूप होऊन जातात. मुलं ही या देशाचं भविष्य आहेत मग या अनाथ मुलांचे भविष्य काय..? आपण ररस्त्यावर , रेल्वे स्टेशनवर आणि बर्याच ठिकाणी लहान लहान मुले भिक मागताना बघतो आपण आपल्या मुलांचे जबाबदार पालक म्हणून घेतो मग या भिक मागणार्या मुलांना पाहून आपल्या मनात काहीच चलबिचल होत नाही का..? पेपरमध्ये आपण नेहमीच वाचत असतो, नवजात अर्भक गटारात सापडले किंवा कचर्याच्या कुंडीत सापडले तेव्हा आपले मन चर्र होत नाही का..? असे एक ना अनेक प्रश्न  आपल्या मनात येतात आणि निघूनही जातात पण या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला " जननी आशिष" मध्ये मिळतात. 1989 साली डॉ. किर्तीदा प्रधान यांच्या प्रेरणेतून डोंबिवलीतील 21 महिलांनी एकत्र येऊन वरील सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवण्याचे प्रयत्न केले आणि " जननी आशिष चॅरीटेबल ट्रस्टची" निर्मिती झाली. अनाथ निराधार बालकांची माय बनून त्यांचे संगोपन करणे त्यांना माया आणि प्रेम देणे तसेच या मुलांना सुयोग्य जोडप्यांच्या स्वाधिन करून त्यांना समाजात सन्मान, सुरक्षितता व स्थिरता मिळवून देणे ही उद्यीष्टे डोळ्यासमोर ठेऊन संस्थेच्या कामास सुरूवात झाली. कुठल्याही सरकारी मदतीची अपेक्षा न ठेवता स्वतः ची कमाई याकामी लावली गेली आणि एक एक बाळ आपलेसे करण्यास सुरूवात झाली. आत्ता पर्यंत जवळपास 550 मुले या संस्थत दाखल करून घेतली गेली आणि जवळपास 425 एवढ्या मुलांना हक्काचे घर आणि आई वडील मिळवून दिले. मुलांच्या संगोपनासाठी प्रशिक्षीत जबाबदार कार्यकर्ते, कर्मचारी वर्ग , नर्स, आया मावश्या,आणि कायदेशीर बाजू सांभाळण्या करीता वकिल अहोरात्र झटत असतात. समाजातील चांगूलपणा वर विश्वास ठेवून ही संस्था चालविली जाते. समजातील अनेक लोक आर्थिक ,वस्तूरूपाने तसेच कपडे, धान्य, गरजेच्या आवश्यक वस्तु देऊन मदतीचा हात देत असतात. मुख्य म्हणजे डोंबिवलीतील सर्व डॉक्टर्स मोफत वैद्यकीय सेवा देत असतात.  विशेष नजरेत येणारी गोष्ट म्हणजे संस्थेच्या गेट बाहेर एक छान आेटा बनवून त्यावर एक पाळणे ठेवले आहे.हे पाळणे बरेच काही शिकवून जाते.संवेदनशिन मनाला हे पाळणे पाहून गहीवरून येते. दत्तक प्रक्रिये मधील किचकट तरतुदींमुळे बर्याच वेळा मुलांना पालक मिळण्यास वेळ जातो हे खरे असले तरी संस्थेचे प्रयत्न अविरत चालूच असतात.
                                       --✍जयेश अ. माधव
विदर्भ मराठवाड्यातील दुष्काळ आणि कोकणातील वास्तव...                               24/05/2016   10:43

विदर्भ आणि मराठवाड्यात दुष्काळाने थैमान घातला आहे. लोक पाण्यासाठी विस्थापित होत आहेत.जगण्यासाठी धडपडत आहेत. अनेक लोक,अनेक संस्था मदतीसाठी पुढे येत आहेत. दुष्काळी भागात पाण्याचे स्त्रोत कसे वाढवता येतील याचा अभ्यास होत आहे आणि त्यावर कामही चालू झाले आहे. माणुस माणसाला जगवण्यासाठी धडपडत आहे. पण.... या सगळ्याकडे कोकणी माणुस कसा बघत आहे...?
संपूर्ण भारतात सर्वाधिक पाउस पडणारी जी ठिकाणे आहेत त्यात कोकणाचा समावेश होतो.त्यामुळे फार मोठा पाणी प्रश्न कोकणात निर्माण होत नाही असेच चित्र सगळीकडे निर्माण केले जात आहे आणि कोकणी माणसाला त्याचा भारी अभिमान वाटत आहे. आता मे महिन्यात कितीतरी कोकणी माणसे गावाकडे फिरकत नाहीत कारण गावात पिण्यासाठी पाणी नाही. कोकणी माणुस गणपतीच्या वेळेस गावी जातो कारण त्यावेळेस पाण्याची जराही चिंता नसते.पण मे महिन्यात अनेक गावात अनेक वाड्या.वर, अनेक वस्त्यांवर कुणीही कितीही नाही म्हंटले तरीही पाण्याचा प्रश्न आवासून उभा आहे. तळ कोकणात अनेक विहिरींनी तळ गाठला आहे.पाण्यापायी किती तरी शेतात फक्त एकच पिक घेतले जाते. नाहीतरी तसे आता शेतीकडे फारसे कोणी बघेनासे झाले आहेत. शेत विकायचे प्रकारही वाढीस लागले आहेत. त्यामुळे पाणी प्रश्नाकडे फारसे गांभीर्याने कोणी बघताना दिसत नाहीत.
आता फक्त वाडी वस्तीवर पाणी प्रश्न निर्माण झाला आहे. तो संपूर्ण गावात यायला वेळ लागणार नाही. कोकणी माणसाने वेळीच जागे होणे आवश्यक आहे. विदर्भ मराठवाड्यात ज्या उपाय योजना चालू आहेत त्या कोकणातही चालू करायला हव्यात. सरकार पाण्यासाठी अनेक योजना राबवत आहे. त्या सर्वांचा कोकणातल्या जनतेने लाभ उठवला पाहिजे.शेत तळे, जलयुक्त शिवार योजना,पाणी अडवा पाणी जिरवा,शेत विहीर,पाट बंधारे योजना अश्या अनेक योजना सरकार राबवत आहेत या योजना आपल्यासाठीही आहेत याचा विचार कोकणी माणसाने करायला हवा.फेसबुक वर अनेक तरुण आपल्या गावाबद्दल भरभरून लिहिताना दिसतात, आपल्या गावाबद्दल प्रेम तर सर्वांनाच असते, अशा तरुणांनी पुढे येउन खरोखरच आपला गाव पाणी प्रश्नाने ग्रासला तर नाही ना याचा विचार जरूर करावा. कोकणात कितीतरी खेडी आहेत जी मे महिन्यात पाण्यासाठी तहानलेली असतात. तरुण मित्रांना माझी कळकळीची विनंती आहे कि त्यांनी विदर्भ,मराठवाड्याची परिस्थिती कोकणात येण्याची वाट पहात राहू नये,तर आत्ता पासूनच पाण्याचे महत्व प्रत्येकाला पटवून द्यायला हवे. महाराष्ट्रात पाण्याचा दुष्काळ पडला असताना कोकणातील रस्त्ये टँकरने धुतले जात आहेत याला काय म्हणावे...? अति आत्मविश्वास कि मस्ती...? कोकणातला शेतकरी आणि घाटावरचा शेतकरी यात तुलना करत रहाण्यापेक्षा आपल्यावर अशी वेळ येऊ नये या साठी काही करता येत असेल तर ते करावे. कोकणात पाउस खूप पडतो पण उतार जमीन असल्यामुळे जास्तीत जास्त पाणी वाहून जाते आणि समुद्राला मिळते पण आपण मात्र खुश आहोत आपल्याकडे खूप पाउस पडला म्हणून...!!
नुकतीच कोकण भूमी प्रतिष्ठान ने कोकणात जल परिक्रमा आयोजित केली होती जलपुरुष व मॅगसेसे पुरस्कार विजेते श्री.राजेन्द्र सिंह यांनाही आमंत्रित केले होते, त्यांनी कोकणात करण्याजोगे अनेक उपाय सुचवले आहेत जेणे करून कोकणातले पावसाचे पाणी वाहून न जाता ते जमिनीतच मुरेल व जमिनीतील पाण्याची पातळी वाढेल. यावर खूप काळजी पूर्वक काम होणे आवश्यक आहे. कोकणातील नेत्यांनीही याकडे गांभीर्याने पहाणे आवश्यक आहे.खरतर यावर गाव पातळीवर तरुण कार्यकर्त्यांनी विचार करून लोक सहभागातून काम करून घेणे आवश्यक आहे.
शेवटी येवढेच ... कोकण ही देवभूमी आहे,म्हणुन दरवेळी कोकणी माणसाने देवावर अवलंबून राहू नये तर स्वत:च्या सामर्थ्याचा वापर करावा आणि कोकणाला पाणी भूमी बनवून दाखवावी.
जयेश अ.माधव 
jayeshmadhav.blogspot.in

जागतिक हवामान दिन विशेष



        २३ मार्च - जागतिक हवामान दिन विशेष
हिरवे हिरवे गार गालिचे, हरित तृणांच्या  मखमालीचे
त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ती खेळत होती
                                          किंवा
श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे
क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी उन पडे
वरती बघता इंद्रधनुचा गोफ दुहेरी विणलासे
मंगल तोरण काय बांधले नभोमंडपी कुणी भासे
                      अशा कविता ऐकल्यावर आपले मन नकळत निसर्गाच्या कुशीत शिरते आणि स्वप्नांच्या दुनियेत भरारी मारू लागते. निसर्ग हे आपल्या जगण्याचे साधन आहे.या भूतलावर निसर्ग विविध रुपात आपल्याला मदत करीत असतो आणि आपले जीवन सुखकर करीत असतो.निसर्गाचे संतुलन थोडेजरी ढासळले तरी मानवी जीवनावर  त्याचा विपरीत परिणाम होऊ लागतो.निसर्ग संतुलित असणे मानवाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे.
            हवामान हा निसर्गाचा महत्वाचा घटक आहे.हवामान आपल्याला जगण्याची नवी उमेद देतो.चांगला पाउस पडला की शेती,फळे,फुले यांनी अवघी सृष्टी मोहरून जाते.आपले सण उत्सव हे ही हवामानावरच आधारीत आहेत.आपली संस्कृती ही हवामानाच्या अवती भवती विखुरलेली आहे.पृथ्वीवरील हवामान हे अनेक घटकांवर अवलंबून असते.समुद्राच्या पाण्याचे बाष्पीभवन ही सर्वात महत्वाची प्रक्रिया आहे.निसर्ग निर्मित साधनांचा जर योग्य वापर झाला तर निसर्ग चक्रही व्यवस्थित चालू राहते.मागील शतकापासून  औद्योगिकरणाची खूप मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली आहे.त्यामुळे कारखाने वाढले आहेत .दगडी कोळ्श्याचा वापर खूप मोठ्या प्रमाणात वाढला आहे.त्यामुळे co2 आणि मिथेल सारख्या वायूंच्या प्रमाणात वाढ झाली आहे.सरासरी तापमान वाढीचा दर २ ते ३ अंशांनी वाढला आहे.यामुळे वार्याची दिशा तसेच पर्जन्यमान यामध्येही लक्षणीय बदल झाला आहे.वाढले तंत्रात्ञान आणि वाढती लोकसंख्या यामुळेही वातावरणात बदल होत आहेत.तापमान वाढीमुळे ध्रुवीय उपखंडात बर्फ वितळू लागला आहे,त्यामुळे समुद्राच्या पाण्याची पातळी वाढु लागली आहे.हे असेच चालू राहिले तर केत्येक देश समुद्राच्या पाण्याखाली जाऊ लागतील.संपूर्ण जगाला याची कल्पना आहे.
          औध्योगिकरणामुळे मानवाचा विकास झाला.त्याचे उत्पन्न वाढले,जीवनमान सुधारले.आयुष्य वाढले.पण त्याचे परिणाम मात्र हवामानाला भोगावे लागले.जंगले,महासागर,जमीन हे नैसर्गिक साधन संपत्तीचे साठे आहेत हे आपण विसरू लागलो आहोत.पुरण कळत आपण मोठ मोठ्या नद्यांची महती वाचतो पण त्या नद्या आता लुप्त होत चालल्या आहेत.गंगा,यमुना,गोदावरी,तापी अश्या अनेक नद्या ओसाड पडु लागल्या आहेत.सरस्वती नदी तर कधीच लुप्त झाली आहे.दरवर्षी पाण्यासाठी झुंज सुरु असते.विदर्भ,मराठवाडा तर पाण्यासाठी तडफडत असतो.हे अचनक झालेले परिणाम नाहीत तर हे आपणच आपल्यावर आणलॆल संकट आहे.प्रचंड जंगलतोड,तिवरांची कत्तल,समुद्राला हटवून इमारती बांधणे,रेती उपसा अशा प्रकारे नैसर्गिक साधन सामुग्रीची आपण विल्हेवाट लावत आहोत आणि त्याचे परिणामही आपणच भोगत आहोत.औद्योगिक सांडपाणी नदी नाल्यांमध्ये सोडुन नद्यांची गटारे बनवली जात आहेत.हे आपण उघड्या डोळ्यांनी बघत आहोत.नवीन नवीन पाकाराचे रोग उद्भवत आहेत,श्वसनाचे आजार बळावत  आहेत.
          आपल्या देशात पावसाचे प्रमाण घटत चाले आहे.ऋतू आपला कार्यकाल सोडुन पुढे मागे होत आहे.ऐन उन्हाळ्यात पाउस पडत आहे.गारांचा वर्षाव होत आहे.अवकाळी पाउस,गारपीट वाढले,वातावरणातील अचानक बदल यामुळे हातातोंडाशी आलेली पिके नष्ट होत आहेत.हवामान बदलांवर उपाय शोधून त्यासंबंधीची जागरूकता आणणे अतिशय महत्वाचे आहे.वातावरणातील ओझोन वायूचा संरक्षक थर वितळू लागला आहे. समस्त जीवसृष्टीवर विपरीत परिणाम होऊ लागला आहे. जागतिक हवामान बदलांची दखल वेळीच घेतली नाही आणि त्यावर वेळीच उपाय योजना नाही केली तर आगामी काळात पृथ्वीवरील जीवसृष्टीवर संकट कोसळल्याशिवाय राहणार नाही.
 भारत हा कृषी प्रधान देश आहे. भारतात ७०% लोक शेती व शेती पूरक व्यवसाय करतात.भारतीय अर्थव्यवस्था ही आजही मान्सून वरच अवलंबून आहे.शेती, हवाई वाहतूक,तेल कंपन्या, पर्यावरण संस्था यांना नेहमीच हवामानाचा अंदाज आवश्यक ठरत असतो.परंतू आपल्याकडे खात्रीपूर्वक हवामानाचा अंदाज वर्तवणारी यंत्रणा अजूनही उपलब्ध नाही हे खेदाची बाब आहे. ग्लोबल वार्मिंग मुळे वातावरणात अनेक बदल होत आहेत.नैसर्गिक आपत्तीमध्ये वाढ होत आहे.त्याचा परिणाम अर्थ व्यवस्थेवर होत आहे. त्यामुळे प्रत्येकालाच सजग होणे आवश्यक आहे.
आपली जीवन शैली निसर्गाशी मिळती जुळती असली पाहिजे.ऋतू मानाप्रमाणे आपल्याला बदलणे आवश्यक आहे.परंतू ऋतूचक्रेच बदलत आहेत.आणि आपण निसर्गालाच बदलायला निघालो आहोत.शहरात राहणाऱ्या माणसाला निसर्गाची ओढ लागली पाहिजे .आपण चंगळवादी व भौतिक समृद्धीच्या अट्टाहासापाई निसर्गावर मात करू पाहत आहोत.निसर्गावर विजय मिळवणे आपले ध्येय असून उपयोगाचे नाही.तर आपण निसर्गाचे मित्र बनायला हवे. नाहीतर.... २३ मार्च या ''हवामान शास्त्र दिनी'' निसर्गाचे गोडवे गाऊन बाकी दिवस येरे माझ्या मागल्या ....!! असे झाले तर आपणच आपल्या पायावर कुऱ्हाड मारत आहोत हे नक्की....!!                                                                                                                                                                                                                                   जयेश माधव
                                             

ग्राहक साक्षरता


१५ मार्च हा जागतिक ग्राहक दिन म्हणुन साजरा केला जातो..... त्या निमित्ताने....!!

                           ग्राहक साक्षरता  काळाची गरज
          सर्वसामान्यपणे कुठलीही वस्तू खरेदी करणारा तो ग्राहक...!!नेहमीच ग्राहकांची संख्या हि उत्पादकांच्या संख्ये पेक्षा जास्त असते. तरीही मुठभर उत्पादकांकडून आपली पिळवणूक झाली तरी तोंडातून ब्र सुद्धा काढला जात नाही.कारण ग्राहक संघटीत नाही. प्रत्येक ग्राहक जर  ग्राहक म्हणुन आपल्या हक्क आणि अधिकारांविषयी जागरूक झाले तरी उत्पादकांकडून होणारी पिळवणूक आपोआप बंद होईल म्हणुन  ग्राहक संघटीत होणे हि आजच्या काळाची गरज आहे.बाजारात नवीन नवीन वस्तू येत असतात. त्या उत्पादनाची जाहिरात टीव्ही,वर्तमान पत्रे,इंटरनेट,तसेच अनेक मार्गांनी होत असते.आणि या जाहिराती बघूनच उत्पादनाची कुठलीही खातरजमा न करता आपण उत्पादन  खरेदी करत असतो.त्यात कित्येकवेळा आपण फासाविलेही जातो.पण आपण काय करतो..?? फक्त जळफ़ळाट ...!!आत्ता जूनमध्ये सुट्ट्या संपल्या की शाळा सुरु होतील.वह्या ,पुस्तके,गणवेश अमुक एका दुकानातूनच खरेदी कराव्यात असे फरमान शाळांकडून सोडले जातील.किमती जास्त असल्या तरी त्याच दुकानातून घेतल्याशिवाय आपल्याकडे पर्यायही नसेल.अगदी पद्धतशीरपणे ग्राहकांची लूट होत असते .तरीही ग्राहक गप्पच...!! करण तो संघटीत नाही..!!
        १५ मार्च  १९६२ पासून म्हणजेच जवळपास ५४ वर्षे जागतिक पातळीवर ग्राहकांचे मुलभूत हक्क आणि अधिकार यांची सनद उपलब्ध आहे.तसेच जवळपास ३३ वर्षे जागतिक पातळीवर १५ मार्च हा 'जागतिक ग्राहक हक्क दिन' साजरा होत आहे.तरी सुद्धा ग्राहकांची पिळवणूक ,लूट होतच आहे.कारण सुशिक्षित सामाजामध्ये ग्राहक साक्षरतेचा आभाव...!  आपल्याकडे उत्पादक संघटीत आहेत असे म्हटले तरी वावगे ठरू नये.करण ग्राहकांच्या माथी आपले उत्पादन मारण्यासाठी ते एक न अनेक नामी युक्त्या शोधत असतात..त्यांची जाहिरात करत असतात आणि आपण पद्धतशीरपणे त्यांच्या जाळ्यात ओढले जात असतो.आपण फसवले गेलो आहोत हे समजण्या अगोदरच सगळ काम झालेलं असत ... शेवटी आपण वैतागून गप्प बसतो.
      ग्राहकाला वस्तू किंवा सेवा निवडीचा अधिकार आहे.त्या विषयीची सर्व माहिती त्याला मिळायला हवी. जाहिराती,वेस्टने,तसेच माहिती पत्रकांतून सदर सेवा किंवा वस्तू विषयीची माहिती मिळणे कायद्याने बंधनकारक आहे.तरीही ग्राहकांना तशी पुरेशी माहिती उपलब्ध करून दिली जातेच असे नाही किंवा दिलीच तर ती बारीक अक्षरात अपूर्ण माहिती असते.त्यामुळे धावपळीच्या जीवनात त्याकडे बारकाईने  लक्ष दिले जात नाही. ग्राहकांचे हक्क आणि अधिकार अबाधित राखण्यासाठी ग्राहक न्यायालये आहेत.पण तिथ पर्यंत पोहचायचे कसे हेही ग्राहकाला माहीत नसते.साध आपल्या दैनंदिन वापरातले रिक्षा-टकसी वालेही आपल्याला सरळ सरळ खुलेआम लुटत असतात.पण नाहक वाद घालत कोण बसणार..?? अस म्हणुन आपण स्वतःला लुटून घेत असतो.कारण आपण "ग्राहक साक्षर" नाही आहोत.ग्राहकाने स्वतःच सुरक्षित पर्याय निवडायला हवा.आपल्या मुलांना शाळेच्या स्कूल बस मधून पाठवायचे की काही पैसे वाचविण्यासाठी एकाच रिक्षात १०-१२ मुले कोंबून पाठवायचे..! हे आपणच ठरवायला हवे.
        सरकारच्या ग्रहक साक्षरता,ग्राहकांच्या हितासाठी,जागो ग्राहक जागो अशा अनेक जाहीराती  येतात.याशिवाय ग्राहक मंच,ग्रहक न्यायालये,ग्राहक संघटना तसेच प्रसिद्धी माध्यमे ग्राहकांना "ग्राहक साक्षर" बनवायचे काम करत असतात.आपण ग्राहक म्हणुन प्रत्येक वस्तू खरेदी करत असतो.त्यामुळे ग्राहक म्हणुन आपल्याला आपले हक्क आणि अधिकार यांची जाणीव असायला हवी.न्यायालये ,कायदे त्यांचे काम करतच असतात.परंतु आपण स्वतः आपल्या अधिकारांसाठी जागरूक असले पाहिजे नाहीतर वर्षानुवर्षे आपली लूट होताच राहणार यात तिळमात्र शंका नाही.
       १५ मार्च  या" जागतिक ग्राहक हक्क दिनी" आपण" ग्राहक साक्षर" होण्याचा निर्धार केला  तरी ती नवी सुरुवात होईल आणि उद्याचा 'साक्षर ग्राहक' बनण्याची ती नांदी ठरेल.
                                                                                                            
                                                                                                     जयेश अ. माधव
                                                          डोंबिवली
मी मराठीत छापून आलेला माझा लेख