ग्राहक साक्षरता


१५ मार्च हा जागतिक ग्राहक दिन म्हणुन साजरा केला जातो..... त्या निमित्ताने....!!

                           ग्राहक साक्षरता  काळाची गरज
          सर्वसामान्यपणे कुठलीही वस्तू खरेदी करणारा तो ग्राहक...!!नेहमीच ग्राहकांची संख्या हि उत्पादकांच्या संख्ये पेक्षा जास्त असते. तरीही मुठभर उत्पादकांकडून आपली पिळवणूक झाली तरी तोंडातून ब्र सुद्धा काढला जात नाही.कारण ग्राहक संघटीत नाही. प्रत्येक ग्राहक जर  ग्राहक म्हणुन आपल्या हक्क आणि अधिकारांविषयी जागरूक झाले तरी उत्पादकांकडून होणारी पिळवणूक आपोआप बंद होईल म्हणुन  ग्राहक संघटीत होणे हि आजच्या काळाची गरज आहे.बाजारात नवीन नवीन वस्तू येत असतात. त्या उत्पादनाची जाहिरात टीव्ही,वर्तमान पत्रे,इंटरनेट,तसेच अनेक मार्गांनी होत असते.आणि या जाहिराती बघूनच उत्पादनाची कुठलीही खातरजमा न करता आपण उत्पादन  खरेदी करत असतो.त्यात कित्येकवेळा आपण फासाविलेही जातो.पण आपण काय करतो..?? फक्त जळफ़ळाट ...!!आत्ता जूनमध्ये सुट्ट्या संपल्या की शाळा सुरु होतील.वह्या ,पुस्तके,गणवेश अमुक एका दुकानातूनच खरेदी कराव्यात असे फरमान शाळांकडून सोडले जातील.किमती जास्त असल्या तरी त्याच दुकानातून घेतल्याशिवाय आपल्याकडे पर्यायही नसेल.अगदी पद्धतशीरपणे ग्राहकांची लूट होत असते .तरीही ग्राहक गप्पच...!! करण तो संघटीत नाही..!!
        १५ मार्च  १९६२ पासून म्हणजेच जवळपास ५४ वर्षे जागतिक पातळीवर ग्राहकांचे मुलभूत हक्क आणि अधिकार यांची सनद उपलब्ध आहे.तसेच जवळपास ३३ वर्षे जागतिक पातळीवर १५ मार्च हा 'जागतिक ग्राहक हक्क दिन' साजरा होत आहे.तरी सुद्धा ग्राहकांची पिळवणूक ,लूट होतच आहे.कारण सुशिक्षित सामाजामध्ये ग्राहक साक्षरतेचा आभाव...!  आपल्याकडे उत्पादक संघटीत आहेत असे म्हटले तरी वावगे ठरू नये.करण ग्राहकांच्या माथी आपले उत्पादन मारण्यासाठी ते एक न अनेक नामी युक्त्या शोधत असतात..त्यांची जाहिरात करत असतात आणि आपण पद्धतशीरपणे त्यांच्या जाळ्यात ओढले जात असतो.आपण फसवले गेलो आहोत हे समजण्या अगोदरच सगळ काम झालेलं असत ... शेवटी आपण वैतागून गप्प बसतो.
      ग्राहकाला वस्तू किंवा सेवा निवडीचा अधिकार आहे.त्या विषयीची सर्व माहिती त्याला मिळायला हवी. जाहिराती,वेस्टने,तसेच माहिती पत्रकांतून सदर सेवा किंवा वस्तू विषयीची माहिती मिळणे कायद्याने बंधनकारक आहे.तरीही ग्राहकांना तशी पुरेशी माहिती उपलब्ध करून दिली जातेच असे नाही किंवा दिलीच तर ती बारीक अक्षरात अपूर्ण माहिती असते.त्यामुळे धावपळीच्या जीवनात त्याकडे बारकाईने  लक्ष दिले जात नाही. ग्राहकांचे हक्क आणि अधिकार अबाधित राखण्यासाठी ग्राहक न्यायालये आहेत.पण तिथ पर्यंत पोहचायचे कसे हेही ग्राहकाला माहीत नसते.साध आपल्या दैनंदिन वापरातले रिक्षा-टकसी वालेही आपल्याला सरळ सरळ खुलेआम लुटत असतात.पण नाहक वाद घालत कोण बसणार..?? अस म्हणुन आपण स्वतःला लुटून घेत असतो.कारण आपण "ग्राहक साक्षर" नाही आहोत.ग्राहकाने स्वतःच सुरक्षित पर्याय निवडायला हवा.आपल्या मुलांना शाळेच्या स्कूल बस मधून पाठवायचे की काही पैसे वाचविण्यासाठी एकाच रिक्षात १०-१२ मुले कोंबून पाठवायचे..! हे आपणच ठरवायला हवे.
        सरकारच्या ग्रहक साक्षरता,ग्राहकांच्या हितासाठी,जागो ग्राहक जागो अशा अनेक जाहीराती  येतात.याशिवाय ग्राहक मंच,ग्रहक न्यायालये,ग्राहक संघटना तसेच प्रसिद्धी माध्यमे ग्राहकांना "ग्राहक साक्षर" बनवायचे काम करत असतात.आपण ग्राहक म्हणुन प्रत्येक वस्तू खरेदी करत असतो.त्यामुळे ग्राहक म्हणुन आपल्याला आपले हक्क आणि अधिकार यांची जाणीव असायला हवी.न्यायालये ,कायदे त्यांचे काम करतच असतात.परंतु आपण स्वतः आपल्या अधिकारांसाठी जागरूक असले पाहिजे नाहीतर वर्षानुवर्षे आपली लूट होताच राहणार यात तिळमात्र शंका नाही.
       १५ मार्च  या" जागतिक ग्राहक हक्क दिनी" आपण" ग्राहक साक्षर" होण्याचा निर्धार केला  तरी ती नवी सुरुवात होईल आणि उद्याचा 'साक्षर ग्राहक' बनण्याची ती नांदी ठरेल.
                                                                                                            
                                                                                                     जयेश अ. माधव
                                                          डोंबिवली
मी मराठीत छापून आलेला माझा लेख