तंत्रज्ञान आणि पालक

तंत्रज्ञान आणि पालक
फॉरवर्ड क्लासेस डोंबिवली पश्चिम यांनी आयोजित केलेल्या तंत्रज्ञान आणि पालक या कार्यशाळेत अजय दरेकर यांनी केलेले मार्गदर्शन..
तीन वर्षाच्या मुलापासून ते  नव्वद वर्षांच्या आजोबांपर्यंत जग फक्त एका गोष्टी बरोबर जोडले गेले आहे, ती गोष्ट म्हणजे तंत्रज्ञान..! आपल्या मुलाने काहितरी भव्य दिव्य करावं, खुप काहीतरी चांगलं करून दाखवावं यासाठी प्रत्येक पालक झटत असतात. आपलं मुल चांगलं बनावं यासाठी मुलांच्या सर्व गरजा पुऱ्या करत असतात. सर्वांना फळ चांगलं हवं असतं. आपण सगळे पालक फळ चांगलं मिळावं म्हणून फळावरच काम करत असतो, कोणीही मुळांवर काम करायला तयार नसतो. फळांवर काम करू नका मुळांवर काम करा असा संदेशच आपल्याला अजय दरेकर देतात. भारतीय शिक्षण पद्धतीची मुळे शिक्षक आणि पालक ही आहेत, तर विद्यार्थी ही फळं आहेत.सर्वच जण मुले चांगली हुशार झाली पाहीजेत याची अपेक्षा करतात.म्हणजेच फळ चांगलं हवं पण मुळांची मशागत करायला कोणी तयार नाही. खरंतर मुळांवर काम करण्याची खरी गरज आहे. झाडांचं मुळ चांगलं तर फळही चांगलंच येणार..!
निरंतर सुधार ही काळाची गरज आहे. तंत्रज्ञानामुळे सतत नवीन नवीन गोष्टी घडत असतात. आपण जेव्हा लहान होतो तेव्हा रेडिओ होता त्यानंतर ब्लॅक अण्ड व्हाईट टी.व्ही.आला, त्यानंतर कलर टि.व्ही आला. पहिला खुप मोठा टि.व्ही होता आता एकदम चपटा झाला. ट्रंकॉल,पेजर,फोन,मोबाईल आणि आता स्मार्ट फोन आला.बघता बघता कलीयुगाने आपल्या घरात कधी प्रवेश केला हे समजलेच नाही. तंत्रज्ञान माणसाच्या जीवनातला अविभाज्य घटक आहे पण त्याचा वापर कसा करायला हवा हे आधी शिकायला हवे.आपल्याकडे अगोदरही २४
तासच होते आणि आताही २४ तासच आहेत.पण आता आपल्याकडे वेळ नाही.
आपल्या हातात मोबाईल यायला बरीच वर्षे गेली पण आपल्या मुलांच्या हातात मोबाईल लहान वयातच आले. हा फरक जेवढा कमी झालाय तेवढा त्रास वाढला आहे. जेव्हा एखादी गोष्ट आपल्या अंतर्मनात जाते तेव्हा ती सवय बनून जाते आणि एकदा बनलेली सवय सहज सुटणे अशक्य..! तंत्रज्ञान चांगले असले तरी त्याच्या आहारी जाणे योग्य नव्हे.तंत्रज्ञानाचा फायदा माणसाने प्रगती करण्यासाठी करायला हवा.मसाला वाटण्यासाठी पूर्वी पाटा होता आता मिक्सर आहे, पूर्वी ट्रंकॉल होता आता स्मार्ट फोन आहे. हे होणारे बदल म्हणजेच तंत्रज्ञान होय.
आजचा पालक खुप संभ्रमित आहे.योग्य काय आणि अयोग्य काय हे ठरवणं कठीण जात आहे. कारण आपला पायाच आपण विसरत चाललो आहोत.तंत्रज्ञानामुळे माणूस खुप फास्ट झाला आहे. परदेशात खुप चांगल्या प्रकारे याचा उपयोग करत आहेत. आपल्याकडेही तसा प्रयत्न होत आहे. पण पालकांच्या निष्काळजीपणा मुळे ते प्रयत्न फोल ठरत आहेत. काही शाळांमध्ये पुस्तकांचे ओझे कमी करण्यासाठी टॅब वापरायला दिले. हा तंत्रज्ञानाचा फायदा होता पण मुलांनी घरी येवून त्यात फोटो,गाणी, सिनेमा ,गेम आणि नको नको त्या गोष्टी भरून ठेवल्या. शाळेकडून बरेच प्रयत्न केले गेले पण प्रत्येक मुलांवर लक्ष ठेवण शक्य नव्हते. हि जबाबदारी खरंतर पालकांची होती. पालकांनी आपली जबाबदारी वेळीच ओळखली असती तर मुलांचे दप्तराचे ओझे कमी झाले असते. परदेशातील मुले तंत्रज्ञानाची मदत घेऊन अभ्यास करत आहेत आणि आपली मुले मात्र फेसबुक, व्हाट्सअप आणि अनेक सोशल साईट्सवर वेळ घालवत आहेत. पालकही तेच करत आहेत. घराघरात प्रत्येक लहान थोरांच्या हातात स्मार्टफोन आला आहे. परिणामांचा कोणीच विचार करत नाही आहे. व्हाट्सअपवर पाठवलेला प्रत्येक मेसेज अत्यंत महत्वाचा वाटू लागला आहे त्यामुळे थोड्या थोड्या वेळाने मोबाईल तपासत रहाण्याची आपल्याला सवय लागलेली आहे.आपण तंत्रज्ञानाच्या आहारी गेलो आहोत. आपल्या समोर असलेल्या व्यक्तींकडे दुर्लक्ष करून आपण आलेले मेसेज बघण्यात दंग होऊ लागलोय. म्हणजेच आपल्या समोर कोण आहे याबद्दल आपण बेफिकीर झालोय. घरात आल्यावर जेवतानाही आपल्यासमोर टी.व्ही. चालू असयला हवा.त्यामुळे घरात कोणाशीही मनमोकळ बोलणं होत नाही. कोणाला कार्यक्रम बघायचे असतात, कोणाला मॅच बघायची असते तर कोणाला कार्टून्स..! आपल्या जीवनात काय चालले आहे यावर चर्चा करायला कोणाला वेळ नाही.
अगोदर घरात एकच बाबा असायचे..! सगळ्या प्रश्नांची उत्तरे त्या़च्याकडे असायची पण आता प्रत्येक घरात एक नवीन बाबा आलाय.. गुगल बाबा..! त्यामुळे घरातल्या बाबाला आता कोण विचारेनासे झालेय. फेसबुकवर फोटो टाकून किती लाईक्स आणि किती कमेंट्स आलेत ते आपण थोड्या थोड्या वेळाने तपासत राहू लागलोय. यात मुलांबरोबर पालकही तेवढेच सहभागी असतात.
अजुन एक नवीन प्रकार.. सुसाईड अटेम्प्ट..! सरकारी आकडेवारी नुसार देशात जवळपास १४००० मुले शिक्षणाचा ताण सहन न झाल्यामुळे आत्महत्या करतात. शाळेत,कॉलेजमध्ये जाणाऱ्या आपल्या मुलांवर आपला लक्ष असतो काय..? आपली मुले आपल्या पासून बर्याच गोष्टी लपवत असतात. मुलांच्या देहबोलीतून बर्याच गोष्टी स्पष्ट होत असतात. पण एवढा वेळ आहे कोणाकडे..? विशेषतः कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलांकडे लक्ष असणे गरजेचे असते. वेगवेगळ्या कुटुंबातील, वेगवेगळ्या विचारांची मुले एकत्र आलेली असतात.मुलांना कोणाचे काय आवडू लागेल याचा नेम नसतो. अशावेळी पालकांनी सजग असणे महत्त्वाचे आहे. आपली मुले कोणाबरोबर असतात, कोणाशी मैत्री करतात, तणावाखाली वावरत तर नाही ना..हे पालक म्हणून आपल्याला मुलांच्या देहबोलीतून समजायला हवे. आपल्या मुलांच्या हाती स्मार्ट फोन देणे म्हणजे माकडाच्या हातात कोलीत देण्या सारखेच आहे. त्यामुळे निट लक्ष असणे गरजेचे आहे.
तंत्रज्ञानाच्या दृष्टचक्रात फक्त मुलेच अडकली आहेत असे नाही यात पालकही अडकले आहेत.आपल्या मुलांना या दृष्टचक्रातून बाहेर काढायचे असेल तर प्रथम या दृष्टचक्रातून आई वडीलांना बाहेर पडावं लागेल. दहावी पर्यंत हुशार असणारी मुले कॉलेजला गेल्यावर अचानक बिघडू लागतात हे घरात लगेच लक्षात यायला हवे.सोशल माडीयाच्या अती वापरामुळे प्रचंड नकारात्मकता वाढीस लागली आहे. प्रत्येक गोष्टीला वेळीच आवर घातला नाही तर वेळच निघून जाईल.आपल्या लहानपणी शाळा आणि अभ्यास संपला की आपण मैदानी खेळ खेळत असू पण आता मुले मात्र इंटरनेट, टी.व्ही.,गेम यात रमत आहेत. मोबाईल वर गेम खेळणार्या मुलांचे प्रमाण वाढत आहे.गेम कसले असतात तर गोळ्या झाडण्याचे.. हाणामारी करण्याचे..! सतत हे गेम खेळण्यामुळे मुलांना त्याची सवय होते.त्यांच्या अंतर्मनात ते उतरलं जात आणि पुढे तोच त्यांचा स्वभाव बनतो. पालकांना कळतही नाही कि आपलं मुल असं अचानक हिंस्त्र कसं काय बनलय..? पालक म्हणून आपणच याला जबाबदार असतो पण ते आपल्यालाच कळत नाही. भावनिक पातळी दिवसेंदिवस खालावत चालली आहे. त्याचा परिणाम सर्वांनाच भोगावा लागत आहे. अश्मयुगातून आपण आधुनिक युगात आलो पण तंत्रज्ञानाच्या अतिवापरामुळे आपण पुन्हा अश्मयुगाकडे जायची तयारी करू लागलोय. जगात ६०% लोकांना आरोग्याच्या समस्या आहेत पैकी २४% लोकांना फक्त तंत्रज्ञानामुळे समस्या आहेत. शारीरिक हालचाली मंदावत आहेत. तंत्रज्ञानाच्या वापराने मेंदूचा वापर कमी होत आहे.
प्रत्येक पालकांनी विचार करायला हवा,आपण लहान असताना आपले आई वडील घरात आल्यावर आपण कसे वागायचो..? आपले आई वडील आपल्या बरोबर कसा वेळ घालवायचे..? आणि आपण आपल्या मुलांबरोबर कसा वेळ घालवत आहोत..? हा एक प्रश्न जर पालकांनी सोडवला तर पालकांना तंत्रज्ञानाची भीती बाळगण्याची बिलकुल गरज नाही.
आज आपण एकाच घरात राहूनही संवाद मात्र हरवून बसलो आहोत.इंटरनेट वापरात भारत हा नंबर वन देश बनला आहे. इंटरनेटचा सर्वात जास्त वापर गुड मॉर्निग आणि गुड नाईटसाठी होऊ लागला आहे हे दुर्दैवी आहे. आपण तंत्रज्ञान वापरायला हवे पण तंत्रज्ञान आपल्याला वापरू लागलं आहे. खरंतर आपण आपल्या सोयीसाठी तंत्रज्ञान वापरत असतो पण ती सोय आपली कधी गरज बनून जाते ते आपल्यालाच कळत नाही.सगळ्या गोष्टी आपल्या हातात असतात फक्त संयम हवा. तुम्ही कोणाबरोबर वेळ घालवता आणि काय वाचता यावर बर्याच गोष्टी अवलंबून असतात. तुम्ही ठरवलात तर काहीही शक्य आहे. मुलांना कुठल्या वयात काय हवं आहे हे आपणच पहायला हवे.आपण काय करतो,आपण काय बघतो, आपण काय वाचतो,आपण काय ऐकतो हे आपली मुलं बघत असतात. हे बघुनच ती मोठी होत असतात.त्यामुळे प्रत्येक पायरीवर आपल्याला सजग रहायला हवे.
तंत्रज्ञान आपलं आयुष्य सुखकर करण्यासाठी आहे, आपलं आयुष्य आनंदी बनवण्यासाठी नाही हे लक्षात असूद्या.