विदर्भ मराठवाड्यातील दुष्काळ आणि कोकणातील वास्तव...                               24/05/2016   10:43

विदर्भ आणि मराठवाड्यात दुष्काळाने थैमान घातला आहे. लोक पाण्यासाठी विस्थापित होत आहेत.जगण्यासाठी धडपडत आहेत. अनेक लोक,अनेक संस्था मदतीसाठी पुढे येत आहेत. दुष्काळी भागात पाण्याचे स्त्रोत कसे वाढवता येतील याचा अभ्यास होत आहे आणि त्यावर कामही चालू झाले आहे. माणुस माणसाला जगवण्यासाठी धडपडत आहे. पण.... या सगळ्याकडे कोकणी माणुस कसा बघत आहे...?
संपूर्ण भारतात सर्वाधिक पाउस पडणारी जी ठिकाणे आहेत त्यात कोकणाचा समावेश होतो.त्यामुळे फार मोठा पाणी प्रश्न कोकणात निर्माण होत नाही असेच चित्र सगळीकडे निर्माण केले जात आहे आणि कोकणी माणसाला त्याचा भारी अभिमान वाटत आहे. आता मे महिन्यात कितीतरी कोकणी माणसे गावाकडे फिरकत नाहीत कारण गावात पिण्यासाठी पाणी नाही. कोकणी माणुस गणपतीच्या वेळेस गावी जातो कारण त्यावेळेस पाण्याची जराही चिंता नसते.पण मे महिन्यात अनेक गावात अनेक वाड्या.वर, अनेक वस्त्यांवर कुणीही कितीही नाही म्हंटले तरीही पाण्याचा प्रश्न आवासून उभा आहे. तळ कोकणात अनेक विहिरींनी तळ गाठला आहे.पाण्यापायी किती तरी शेतात फक्त एकच पिक घेतले जाते. नाहीतरी तसे आता शेतीकडे फारसे कोणी बघेनासे झाले आहेत. शेत विकायचे प्रकारही वाढीस लागले आहेत. त्यामुळे पाणी प्रश्नाकडे फारसे गांभीर्याने कोणी बघताना दिसत नाहीत.
आता फक्त वाडी वस्तीवर पाणी प्रश्न निर्माण झाला आहे. तो संपूर्ण गावात यायला वेळ लागणार नाही. कोकणी माणसाने वेळीच जागे होणे आवश्यक आहे. विदर्भ मराठवाड्यात ज्या उपाय योजना चालू आहेत त्या कोकणातही चालू करायला हव्यात. सरकार पाण्यासाठी अनेक योजना राबवत आहे. त्या सर्वांचा कोकणातल्या जनतेने लाभ उठवला पाहिजे.शेत तळे, जलयुक्त शिवार योजना,पाणी अडवा पाणी जिरवा,शेत विहीर,पाट बंधारे योजना अश्या अनेक योजना सरकार राबवत आहेत या योजना आपल्यासाठीही आहेत याचा विचार कोकणी माणसाने करायला हवा.फेसबुक वर अनेक तरुण आपल्या गावाबद्दल भरभरून लिहिताना दिसतात, आपल्या गावाबद्दल प्रेम तर सर्वांनाच असते, अशा तरुणांनी पुढे येउन खरोखरच आपला गाव पाणी प्रश्नाने ग्रासला तर नाही ना याचा विचार जरूर करावा. कोकणात कितीतरी खेडी आहेत जी मे महिन्यात पाण्यासाठी तहानलेली असतात. तरुण मित्रांना माझी कळकळीची विनंती आहे कि त्यांनी विदर्भ,मराठवाड्याची परिस्थिती कोकणात येण्याची वाट पहात राहू नये,तर आत्ता पासूनच पाण्याचे महत्व प्रत्येकाला पटवून द्यायला हवे. महाराष्ट्रात पाण्याचा दुष्काळ पडला असताना कोकणातील रस्त्ये टँकरने धुतले जात आहेत याला काय म्हणावे...? अति आत्मविश्वास कि मस्ती...? कोकणातला शेतकरी आणि घाटावरचा शेतकरी यात तुलना करत रहाण्यापेक्षा आपल्यावर अशी वेळ येऊ नये या साठी काही करता येत असेल तर ते करावे. कोकणात पाउस खूप पडतो पण उतार जमीन असल्यामुळे जास्तीत जास्त पाणी वाहून जाते आणि समुद्राला मिळते पण आपण मात्र खुश आहोत आपल्याकडे खूप पाउस पडला म्हणून...!!
नुकतीच कोकण भूमी प्रतिष्ठान ने कोकणात जल परिक्रमा आयोजित केली होती जलपुरुष व मॅगसेसे पुरस्कार विजेते श्री.राजेन्द्र सिंह यांनाही आमंत्रित केले होते, त्यांनी कोकणात करण्याजोगे अनेक उपाय सुचवले आहेत जेणे करून कोकणातले पावसाचे पाणी वाहून न जाता ते जमिनीतच मुरेल व जमिनीतील पाण्याची पातळी वाढेल. यावर खूप काळजी पूर्वक काम होणे आवश्यक आहे. कोकणातील नेत्यांनीही याकडे गांभीर्याने पहाणे आवश्यक आहे.खरतर यावर गाव पातळीवर तरुण कार्यकर्त्यांनी विचार करून लोक सहभागातून काम करून घेणे आवश्यक आहे.
शेवटी येवढेच ... कोकण ही देवभूमी आहे,म्हणुन दरवेळी कोकणी माणसाने देवावर अवलंबून राहू नये तर स्वत:च्या सामर्थ्याचा वापर करावा आणि कोकणाला पाणी भूमी बनवून दाखवावी.
जयेश अ.माधव 
jayeshmadhav.blogspot.in