जागतिक हवामान दिन विशेष



        २३ मार्च - जागतिक हवामान दिन विशेष
हिरवे हिरवे गार गालिचे, हरित तृणांच्या  मखमालीचे
त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ती खेळत होती
                                          किंवा
श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे
क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी उन पडे
वरती बघता इंद्रधनुचा गोफ दुहेरी विणलासे
मंगल तोरण काय बांधले नभोमंडपी कुणी भासे
                      अशा कविता ऐकल्यावर आपले मन नकळत निसर्गाच्या कुशीत शिरते आणि स्वप्नांच्या दुनियेत भरारी मारू लागते. निसर्ग हे आपल्या जगण्याचे साधन आहे.या भूतलावर निसर्ग विविध रुपात आपल्याला मदत करीत असतो आणि आपले जीवन सुखकर करीत असतो.निसर्गाचे संतुलन थोडेजरी ढासळले तरी मानवी जीवनावर  त्याचा विपरीत परिणाम होऊ लागतो.निसर्ग संतुलित असणे मानवाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे.
            हवामान हा निसर्गाचा महत्वाचा घटक आहे.हवामान आपल्याला जगण्याची नवी उमेद देतो.चांगला पाउस पडला की शेती,फळे,फुले यांनी अवघी सृष्टी मोहरून जाते.आपले सण उत्सव हे ही हवामानावरच आधारीत आहेत.आपली संस्कृती ही हवामानाच्या अवती भवती विखुरलेली आहे.पृथ्वीवरील हवामान हे अनेक घटकांवर अवलंबून असते.समुद्राच्या पाण्याचे बाष्पीभवन ही सर्वात महत्वाची प्रक्रिया आहे.निसर्ग निर्मित साधनांचा जर योग्य वापर झाला तर निसर्ग चक्रही व्यवस्थित चालू राहते.मागील शतकापासून  औद्योगिकरणाची खूप मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली आहे.त्यामुळे कारखाने वाढले आहेत .दगडी कोळ्श्याचा वापर खूप मोठ्या प्रमाणात वाढला आहे.त्यामुळे co2 आणि मिथेल सारख्या वायूंच्या प्रमाणात वाढ झाली आहे.सरासरी तापमान वाढीचा दर २ ते ३ अंशांनी वाढला आहे.यामुळे वार्याची दिशा तसेच पर्जन्यमान यामध्येही लक्षणीय बदल झाला आहे.वाढले तंत्रात्ञान आणि वाढती लोकसंख्या यामुळेही वातावरणात बदल होत आहेत.तापमान वाढीमुळे ध्रुवीय उपखंडात बर्फ वितळू लागला आहे,त्यामुळे समुद्राच्या पाण्याची पातळी वाढु लागली आहे.हे असेच चालू राहिले तर केत्येक देश समुद्राच्या पाण्याखाली जाऊ लागतील.संपूर्ण जगाला याची कल्पना आहे.
          औध्योगिकरणामुळे मानवाचा विकास झाला.त्याचे उत्पन्न वाढले,जीवनमान सुधारले.आयुष्य वाढले.पण त्याचे परिणाम मात्र हवामानाला भोगावे लागले.जंगले,महासागर,जमीन हे नैसर्गिक साधन संपत्तीचे साठे आहेत हे आपण विसरू लागलो आहोत.पुरण कळत आपण मोठ मोठ्या नद्यांची महती वाचतो पण त्या नद्या आता लुप्त होत चालल्या आहेत.गंगा,यमुना,गोदावरी,तापी अश्या अनेक नद्या ओसाड पडु लागल्या आहेत.सरस्वती नदी तर कधीच लुप्त झाली आहे.दरवर्षी पाण्यासाठी झुंज सुरु असते.विदर्भ,मराठवाडा तर पाण्यासाठी तडफडत असतो.हे अचनक झालेले परिणाम नाहीत तर हे आपणच आपल्यावर आणलॆल संकट आहे.प्रचंड जंगलतोड,तिवरांची कत्तल,समुद्राला हटवून इमारती बांधणे,रेती उपसा अशा प्रकारे नैसर्गिक साधन सामुग्रीची आपण विल्हेवाट लावत आहोत आणि त्याचे परिणामही आपणच भोगत आहोत.औद्योगिक सांडपाणी नदी नाल्यांमध्ये सोडुन नद्यांची गटारे बनवली जात आहेत.हे आपण उघड्या डोळ्यांनी बघत आहोत.नवीन नवीन पाकाराचे रोग उद्भवत आहेत,श्वसनाचे आजार बळावत  आहेत.
          आपल्या देशात पावसाचे प्रमाण घटत चाले आहे.ऋतू आपला कार्यकाल सोडुन पुढे मागे होत आहे.ऐन उन्हाळ्यात पाउस पडत आहे.गारांचा वर्षाव होत आहे.अवकाळी पाउस,गारपीट वाढले,वातावरणातील अचानक बदल यामुळे हातातोंडाशी आलेली पिके नष्ट होत आहेत.हवामान बदलांवर उपाय शोधून त्यासंबंधीची जागरूकता आणणे अतिशय महत्वाचे आहे.वातावरणातील ओझोन वायूचा संरक्षक थर वितळू लागला आहे. समस्त जीवसृष्टीवर विपरीत परिणाम होऊ लागला आहे. जागतिक हवामान बदलांची दखल वेळीच घेतली नाही आणि त्यावर वेळीच उपाय योजना नाही केली तर आगामी काळात पृथ्वीवरील जीवसृष्टीवर संकट कोसळल्याशिवाय राहणार नाही.
 भारत हा कृषी प्रधान देश आहे. भारतात ७०% लोक शेती व शेती पूरक व्यवसाय करतात.भारतीय अर्थव्यवस्था ही आजही मान्सून वरच अवलंबून आहे.शेती, हवाई वाहतूक,तेल कंपन्या, पर्यावरण संस्था यांना नेहमीच हवामानाचा अंदाज आवश्यक ठरत असतो.परंतू आपल्याकडे खात्रीपूर्वक हवामानाचा अंदाज वर्तवणारी यंत्रणा अजूनही उपलब्ध नाही हे खेदाची बाब आहे. ग्लोबल वार्मिंग मुळे वातावरणात अनेक बदल होत आहेत.नैसर्गिक आपत्तीमध्ये वाढ होत आहे.त्याचा परिणाम अर्थ व्यवस्थेवर होत आहे. त्यामुळे प्रत्येकालाच सजग होणे आवश्यक आहे.
आपली जीवन शैली निसर्गाशी मिळती जुळती असली पाहिजे.ऋतू मानाप्रमाणे आपल्याला बदलणे आवश्यक आहे.परंतू ऋतूचक्रेच बदलत आहेत.आणि आपण निसर्गालाच बदलायला निघालो आहोत.शहरात राहणाऱ्या माणसाला निसर्गाची ओढ लागली पाहिजे .आपण चंगळवादी व भौतिक समृद्धीच्या अट्टाहासापाई निसर्गावर मात करू पाहत आहोत.निसर्गावर विजय मिळवणे आपले ध्येय असून उपयोगाचे नाही.तर आपण निसर्गाचे मित्र बनायला हवे. नाहीतर.... २३ मार्च या ''हवामान शास्त्र दिनी'' निसर्गाचे गोडवे गाऊन बाकी दिवस येरे माझ्या मागल्या ....!! असे झाले तर आपणच आपल्या पायावर कुऱ्हाड मारत आहोत हे नक्की....!!                                                                                                                                                                                                                                   जयेश माधव